संविधानावर १९९२ पासून हल्ले वाढले, फॅसिस्ट शक्तींना रोखण्यासाठी संविधान वाचवण्याची गरज

Foto

औरंगाबाद – देशाचे संविधान धोक्यात आले आहे. सर्वसामान्यांच्या मुलभूत प्रश्नांवरुन लक्ष विचलीत करण्यासाठी जाती-धर्माच्या नावाने धृवीकरण करण्याचे प्रयत्न फॅसिस्ट शक्तींकडून सुरु आहेत. ते थांबवण्यासाठी देश बचाओ-संविधान बचाओमोहिमेंतर्गत जेएनयू विद्यार्थी संसदेचे माजी अध्यक्ष कन्हैय्याकुमार यांच्या जाहीर सभेचे येत्या रविवारी औरंगाबादेत आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण या कार्यक्रमाचे संयोजक असल्याची माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव प्रा. राम बाहेती यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. बाहेती म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबररोजी लाखो दलित, बहुजन त्यांना अभिवादन करण्यासाठी रस्त्यावर उतरतात. याच दिवशी १९९२ला बाबरी मशिद पाडण्यात आली. तेव्हापासून भारतीय संविधानावर हल्ले सुरु आहेत. गेल्या चार-साडेचार वर्षात देशात फॅसिस्ट शक्तींनी खुलेआम संविधानावर आणि देशाच्या एकतेवर हल्ले सुरु केले आहेत. ते म्हणाले, मागील साडेचार वर्षांपासून सत्तेत असलेल्या सरकारच्या काळात संविधानावरील हल्ले वाढत चालले आहेत. हिंदूत्वाच्या नावाने, गोरक्षेच्या नावाने संविधानावर हल्ले होत आहेत. खुलेआम संविधान जाळले जात आहे. या सर्वांचा विरोध करण्यासाठी देशभरात संविधान बचाओ रॅली होत आहे.

फॅसिस्ट शक्ती जाती-धर्माच्या नावाने ध्रुवीकरण करुन सत्तेवर राहाण्याचे आणि त्या माध्यमातून संविधान कमकुवत करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप प्रा. बाहेती यांनी केला. ते म्हणाले,  बुलंदशहरामध्ये पोलिस अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली. हा पोलिस अधिकारी हिंदू होता.  हिंदूत्वाच्या नावावर राजकारण करणाऱ्या मंडळींना हे लक्षात येत नाही की महाराष्ट्रात आत्महत्या करणारे ९९ टक्के शेतकरी हिंदू आहेत. शेती, रोजगार या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी जाती धर्माच्या नावावर धृवीकरण करुन सत्तेवर कायम राहाण्याचे फॅसिस्ट शक्तींचे प्रयत्न आहेत. संविधानावर होणारे हल्ले थांबवण्याची गरज आहे, त्यासाठी संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रा. बाहेतींनी सांगितले.

कन्हैय्याकुमार दोन महिन्यांपूर्वीच मराठवाड्यात येऊन गेले आहेत. हा त्यांचा दुसरा मराठवाडा दौरा आहे. ९ ते १४ डिसेंबर दरम्यान मराठवाड्यातील विविध शहरात त्यांच्या सभा होणार आहेत.  येत्या रविवारी सायंकाळी ६ वाजता आमखास मैदान येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्याआधी सकाळी सिल्लोडमध्ये त्यांचा कार्यक्रम होणार असल्याचे प्रा. बाहेतींनी सांगितले. यावेळी आमदार सतीश चव्हाण, भाकप जिल्हा सचिव अश्फाक सलामी,  अभय टाकसाळ,  ईलियास किरमाणी, प्रा.सुनील मगरे,  डॉ.राजेश करणे उपस्थिती होते.